Manisha Awekar

Others

2  

Manisha Awekar

Others

21 दिवसांचा मी अनुभवलेला बिग बॉस

21 दिवसांचा मी अनुभवलेला बिग बॉस

3 mins
61


लॉकडाऊनमधे सगळेच घरात थांबले. सतत सान्निध्यात आल्यावर सहवासाचा आनंद मिळतो.पण दुसरी बाजू अपेक्षाही वाढतात. ह्या दोन्ही बाजू घरातील "बिग बॉस " कशी हाताळते,दोन्हीचा सुनियोजित मेळ कसा घालते ह्यावर घरातले वातावरण अवलंबून असते.


  सकाळी चालणे ही साठीपुढील वयाची गरज आहे. फिटनेससाठी सकाळी चालणे आवश्यक असल्याने मी नाश्त्याची जबाबदारी सूनेवर सोपवली व नंतरची भांडी घासणे माझ्याकडे घेतले . माझ्या दोन्ही सुना प्रेमळ व समजूतदार आहेत. ज्याच्या हाताला लागेल तसे काम करतो. 


  सर्वजण घरी असल्याने नाश्त्याला विविध पदार्थांची मागणी होऊ लागली..आता प्रत्येक पदार्थासाठी लागणारे घटक बाहेरुन पदार्थ आणणे शक्य नव्हते.म्हणून .आहे त्यातच नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ करुन घरच्यांना खूष केले.


  आपण कधीकधी म्हणतो कामात मदत घेता आली पाहिजे. मिस्टर सकाळी पेपर नाही म्हणून टाईमपास करत होते. मी सुहास्यमुद्रेने आकर्ण हसत ह्यांना आर्जवाने विचारले "अहो मला जरा ह्या दूधाच्या पिशव्या फोडून देता का?"

हे हो म्हणाले आणि लागले की कात्री लावून फोडायला!!

"अहो पिशव्या धुवा चांगल्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या नळाने. तुमचे हात डेटॉलने स्वच्छ धुवा अन् पातेल्यात बुडाशी थोडे प्यायचे पाणी टाका. नाहीतर दूध करपेल."

"एवढ्या क्रियाप्रक्रियांनी दूध तापतं हे मला आजच कळलं!!"ह्यांनी अज्ञान व्यक्त केलं."आता पुढचं तू बघ हं" असं म्हणून स्वारी सटकली.

खरी मजा पुढेच सुरु झाली. थोड्याच वेळात दूधातून आवाज यायला लागले.बघते तर ह्यांनी ताकाची पिशवी दूधात फोडलेली. झाले आता चिडून तरी काय उपयोग होता?

डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून मुलाला दूध मिळते का बघ सांगायला गेले तर "आई अगं बाहेर पडणं सोपं आहेका? ऑनलाइन बघतो मिळाले तरं. आई तुझी कामं बाबांना कशाला सांगतेस?तुझी तूच करत जा बरं" असा अनाहूत सल्लाही मिळाला. हे निवांत फोनवर गप्पा मारत होते आणि मी मूकपणे पश्चातापदग्ध अवस्थेत पुढची कामे करीत होते.

शेवटी त्या दूधाला विरजण लावून शेजारणींना कढी वाटली झालं. देताना सुद्धा सगळं समजावून सांगायला लागलं. आता तुम्हीच सांगा बिग बाँससाठी किती कसोटीचा आहे हा लॉकडाऊनचा काळ!!


घरात एकत्र कुटुंबात रहाताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या पिढीपेक्षाही नवीन पिढी आधिक सजग आहे. घरात पण त्यांचे चांगले लक्ष आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे ते वागत नाहीत.


  ही पुढची पिढी आधिक समंजस आहे कारण त्यांच्या बायका बरोबरीने नोकरी करुन कमवणा-या आहेत.जिथे नोकरी नाही तिथेही सामंजस्य दिसते .हा पिढीतला बदल म्हणून स्विकारला पाहिजे.


  घरात रिकामा वेळ व रिकामी माणसे, लहान मुले आहेत तिथे कँरम पत्त्यांचे डाव रंगले. मी माझी सून गौरी नातू अनुराग मिस्टर असे चौघेजण कँरम खेळलो. त्यात ड्यू झाल्यावर, जवळची सोंगटी घेताना कोपर आत जाईपर्यंत केलेली ढकलमपंजी, तसेच एकदम कडेची सोंगटी थोडीच मागे राहिली तर लक्ष नाही असे समजून हाताने ढकलणे ह्या गोष्टी हास्याची खसखस पिकवणा-या असतात.त्याचा मनमुराद आनंद घेतला. 


  मी निवृत्त असल्याने मला घरी असायची सवय.त्यात सिंथेसायझर वाजवणे कविता करणे चारोळी लेख लिहिणे हे छंद आधीपासूनच असल्याने मला लॉकडाऊन फारसे जाचक वाटले नाही.व्हिडीओ काव्यवाचनामधे आपण कसे सादर करतो हे समजले.त्याबाबत मिस्टरांनी

खूपच सहकार्य केले.व्हिडीओ कधी पुन्हा काढावा लागला तरी नाराजी दर्शवली नाही. 

चाळीस वर्षात प्रथमच असा रिकामा वेळ मिळालेला. माझी नोकरी व ह्यांची नोकरी त्यामुळे सतत धावपळ आता निवांत वेळ मिळाल्याने नव्याजुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ह्या काळात भरपूर गप्पा मारायला मिळाल्या.साहित्यातील अलक (अती लघुतम कथा) द्रोणकाव्य चारोळी जुगलबंदी षडाक्षरी अष्टाक्षरी दशाक्षरी हे प्रकार शिकता आले.

  

Every cloud has silver lining ह्या उक्तीप्रमाणे हे लॉकडाऊन खट्टा मीठा चवीत आपल्याच हितासाठी चालू आहे. याची सौम्य शब्दांत मिस्टरांना जाणीवकरुन द्यायला लागायची. अशावेळी संयम खूप बाळगायला लागायचा.


ये जीना है अंगूरका दाना

कुछ खट्टा है कुछ मीठा है

ह्या न्यायाने आपल्याही आयुष्यात सर्वच दिवस सारखे कसे असतील?कभी धूप कभी छाँव !!कधी मौजमजा कधी चिडचिड असा जीवनरसाचा पेला आहे.

 तेव्हा जे समोर येईल त्याला स्विकारणे , हसतमुखाने सामोरे जाणे आवश्यकच आहे

संतमहंतांनी म्हटलेच आहे ना

ठेविले अनंते , तैसेचि रहावे

चित्ती असू द्यावे , समाधान


Rate this content
Log in