विठू माऊली...!!🙏
विठू माऊली...!!🙏
उभी विटेवरी । ती विठूमाऊली ।
देते ती सावली । नेहमीच //१//
विठ्ठल विठ्ठल । नामाचा गजर ।
विठूची नजर । भक्तांवर //२ //
सान थोर नाही /विठू च्या दिंडीत
महाराष्ट्र वारीत/ उतरला // ३//
दिंडीत पताका / डोले वाऱ्यावर
पाय तालावर / पडे पुढे //४ //
जागोजागी कसे /होतसे स्वागत
तरुण वर्गात/ चर्चा असे //५//
केशरी रंग हा/ भावतो मनाला
दिंडीत भरला /जणू मेळा //६//
टोपी नि फेटे ते / घालुनी चालती
भजन करती/ रंगुनिया //७//
भान ना देहाचं/ भान ना भुकेचं
अनवाणी पाईचं /चालती ते //८//
आस ना कशाची / निर्विकार मन
वृद्ध वा लहान /भक्तीमय //९//
आषाढी कार्तिकी/ पंढरीत वारी
नित्य नेमे करी /वारकरी // १०//
चंद्रभागे तिरी / करोनिया स्नान ।
चैतन्य उधाण /शिरले रे //११//
विठूचे दर्शन / व्हावे हीच आस ।
जळीस्थळी भास /विठूचाच //१२//
मनाच्या शांतीचे /एकच ठिकाण ।
विठूचे चरण / आणि काय //१३//