STORYMIRROR

Bhavnesh Pohan

Others

4  

Bhavnesh Pohan

Others

विहीर

विहीर

2 mins
192

सुकलेल्या विहीरीच्या तळाकडे ती एकटक पाहत बसलेली

असते, दिवसभर

काय पाहते, काही कळत नाही

तिचं असं काय हरवलंय, जे मिळत नाही

गावातली लोकं तिला बघावं तेव्हा वेडी

म्हणून चिडवतात

कशी अवदसा जन्माला आली असं,

पाहताक्षणीच हिणवतात


तिच्यावर मात्र या गोष्टींचा काहीच

फरक पडत नाही

या विहीरीशिवाय जणू तिचं काहीच

अडत नाही

कुणीतरी कीव म्हणून दिलेली भाकरी

ती खात असते

पण खाण्याआधी त्याचा अर्धा तुकडा

न चुकता विहीरीत टाकते


कुतूहलापोटी त्या दिवशी मी

तिच्या बाजूला जाऊन बसलो

माझ्याकडे तिने नजर वळवताच

जरा आपुलकीने हसलो

तिचे ते विहीरीइतकेच खोल डोळे

काहीतरी बोलू पाहात होते

तिच्या त्या शून्य नजरेतलं एकलेपण

जणू काही माझ्याच उरी दाटत होते

ही अबोल शांतता संपवण्यासाठी मी तिच्यासमोर

सोबत आणलेली भाकरी ठेवली

तेव्हा चेहऱ्यावर कसलाही भाव न आणता तिनं

तिची नजर खालच्या डोहाकडे वळवली


"भरली आहेत लेकरांची पोटं, त्यास्नी आता

कुशीत घ्याया हवं", असं काहीतरी ती पुटपुटली

आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या डोळ्यांदेखत

ती या काळ्याकुट्ट विहीरीचा अंधार झाली


Rate this content
Log in