ती बिझीच असते आजकाल जरा
ती बिझीच असते आजकाल जरा
1 min
424
ती बिझीच असते आजकाल जरा
तिच्याच विश्वात दंग वगैरे
वावर असतो फक्त तिचा भोवती
सोबत आता जाणवत नाही
मोजकंच बोलणं होत आणि
स्पर्श होतात तेही अनोळखी
नातेवाईकांसमोर हसरे चेहरे
एकमेकांकडे पाहणं होतही नाही
आठवते मग ती संध्याकाळ
जणू काही कालच घडलेली
या सात वर्षांची घडी
नकळतच उलगडलेली
हाच तो समुद्र किनारा
जिथे पहिल्यांदा भेटलो होतो
नकळत झालेल्या स्पर्शांना
आम्ही दोघेहि भुललो होतो
आधी प्रेमाच्या शपथा मग
लग्नाच्या गाठीत अडकलो
एकमेकांना समजण्याआधीच
एकमेकांच्या बेड्या मात्र बनलो
आता शब्द म्हणजे भांडण
आणि भांडण म्हणजे अबोला
हे टाळण्यासाठी मग उरतो फक्त
बिझी असण्याचा एकच बहाणा
