पहिली ओळ
पहिली ओळ
1 min
129
असं ठरवून लिहिता आलं असतं
तर कितीतरी आणि कायकाय
लिहिलं असतं
सुटत असताना गाठ
तिचं एक टोक तरी घट्ट
धरता आलं असतं
पण असं ठरवून काही
आठवत नाही
नेमक्या वेळेला ते
टोकही सापडत नाही
अशावेळी मग उगाच
का गिरवायचं
खोटंखोटं पाणी
डोळ्यांत का अडवायचं
म्हणून राहू द्यायचं आपण
आपल्या मनाला शांत
शोधू द्यायचा त्याला
त्याचाच एखादा प्रांत
फिरताना तिथे जर
झाला आठवणींचा कल्लोळ
झिरपेल तेव्हा कागदावर
कवितेची पहिली ओळ
