वारी
वारी
जीवनात करावी एकदातरी वारी
साठवावा सावळा विठ्ठल उरी
चाले चहूकडे हरिनामाचा गजर
माऊली माऊली शब्दाचा बोलण्यात वापर
हातात असती टाळ-पताका
विठ्ठलास मारती प्रेमाने हाका
जात, श्रीमंत-गरीब अशी येथे ना दरी
सगळेच विठ्ठलाचे भक्त वारकरी
कोणी म्हणे अभंग कोणी भारूड
प्रत्येकाच्या मनावर विठ्ठलनामाचे गारुड
वाटेत घ्यावा थोडासा विसावा
प्रत्येकाला वाटे विठ्ठल पहावा
टाळ मृदूंगाचा चाले नाद
चहूकडे नुसता आनंदीआनंद
चालताना न वाटे श्रम आणि शीण
विठ्ठलभेटीच्या ओढीने हरपे भूक तहान
विठ्ठलमय होई सारे वातावरण
वारकरी डोले देहभान विसरून
अंतःकरण जाई त्याचे पुरते भरून
जेव्हा विठ्ठल पाही तो डोळे भरून
नेत्रदीपक पाहावा रिंगण सोहळा
लावून भाळी गोपीचंदनाचा टिळा
चंद्रभागा बहिण पंढरी माहेर
विठ्ठलाचे दर्शन हाच मोठा आहेर
