तृप्ती....!
तृप्ती....!
मी उत्साहाने मित्रांना दाखवायचो
आमच्या अंगणातील खोल पेवातली
काळपट पांढरी ज्वारी ....
सारवलेल्या जमिनीच्या
भेगांच्या गर्दीत ....
त्यांना भेगा दिसायच्या नाहीत ,
ते पेवातल्या उग्र वासाला
टाळण्यासाठी
नाकाला रुमाल लावायचे ....
मग माझे आजोबा
पेटता दिवा पेवात सोडायचे
तो दिवा विझायचा
आजोबा पुन्हा .... पुन्हा पेटता दिवा
पेवात टाकायचे ....
शेवटी
तो दिवा पेवात पेटत राहिला की ....,
मग आजोबा
पेवातनं ज्वारी बाहेर काढायचे ....
अन रात्रीला
गरम गरम भाकरीवर
हिरव्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा
जिभेला झोम्बायचा ....
डोळ्यात पाणी आणायचा ,,,,
पोट आणि मन
तृप्त व्हायचं तेव्हा .... !!!!