तडाखा आणि जिद्द
तडाखा आणि जिद्द
शांत समुद्र अकस्मात खवळला
बसल्या लाटांच्या धडका किनाऱ्याला
उंच उंच रौद्र स्वरूपी उसळल्या
लाल मातीमध्ये चांगल्या घुसळल्या
नावा लागल्या सुरक्षित जागेला
मोठी जहाजे नांगरून बंदराला
वारा सुटला सोसाट्याचा सैरावैरा
करीत वार आठवून जुन्या वैरा
बरसून मुसळधार पावसाने
केला कहर झोडपून निसर्गाने
आडवे केले ताड माड पोफळीला
अन साऱ्या केळीबागा,आमराईला
विनाश लहरीने या केले उध्वस्त
राहील पुन्हा उभे कोकण समस्त
चिवट, कष्टकरी, कणखर बाणा
कोकणचा माणूस ठेवी ताठ माना
उठेल राखेतून फिनिक्स प्रमाणे
या मातीचा गूण दैवा सामोरे जाणे
येवो अशी कितीक वादळे जीवनी
महाराष्ट्राची जिद्द पाहिल अवनी
