श्रावण साजरा
श्रावण साजरा
रेशीम सरी श्रावणाच्या आनंद देती मनाला
रिमझिम धारा वर्षूनी चिंब करती तनुला
हिरवी झाली धरा वाहिले निर्झर देती साद
कोसळती प्रपात गिरी कंदरी करीत नाद
शेते शिवारे डोलती आनंदाने पक्षी भुलला
तृणपात्यांना,लता वेलींना आला नव तजेला
फुलली प्रीत अंतरी फुलपाखरे फुलभ्रमी
इंद्रधनू नभी ऊन सावली हिंदोळे पश्चिमी
कृष्ण धवल होती पूर्वी त्या स्वप्नांना रंग आला
गोपगोपी वृंदावनी कृष्ण आमचा नंदलाला
गोवर्धन धारी गोकूळ वासीयांना प्रिय भारी
निर्विष केला यमुनेचा डोह दुष्ट कंसा मारी
अवखळ लीला करतो मथुरेत कृष्ण काला
फोडून हंडी मित्रांसवे घरोघरी दही काला
रेलचेल सणांची होई सुरू श्रावणा पासून
धर्म,देश,संस्कृतीचे होई प्रदर्शन, जतन