तारेवरची कसरत
तारेवरची कसरत
मन ओळखण्या मना
मुक नजरेची वाणी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी//धृ//
घट सृजनाचा हाती
बीज अंकुरे कुशीत,
विश्व उद्याचे लपले
बघा धरेच्या मुशीत,
विश्वासचे गोड पाणी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी//१//
उपजत लाभलेली
दुरदृष्टी प्रज्ञा बुद्धी,
बळी देते भावनांचा
पाणी भरे रिद्धि सिद्धि,
सारे माने तेव्हा राणी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी//2//
ममतेची वात्सल्याची
अनमोल प्रेमभेट,
नाही उजवली कुस
जग म्हणती वांझोट,
कशी देवाची करणी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी//3//
घरदार मुलंबाळ
सासु सासरे नवरा,
परिवार सर्वकाळ
रातदिन हे आवरा,
काळ चाले भांडीधुणी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी//4//
भोग कधी न सरती
कसरत तारेवरी,
काम नौकरी करती
हाती शस्त्रे दुर्गा परी,
नाही करत गाऱ्हाणी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी//5//
तिच्या वाचून निरस
निरर्थक हे जगणे,
करू नको रे वल्गना
तुज एकचि मागणे,
झेप घेऊ दे गगनी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी//6//
