तान्हा पोळा
तान्हा पोळा
1 min
1.3K
होतोया उशीर
कर जरा घाई
बोलाविती सारे
आवर ना ताई।।धृ।।
सवंगडी झाले
पारावर गोळा
सजलाया बघ
कसा तान्हा पोळा
सोबतीला माझ्या
शेजारचा साई।।1।।
घुंगराच्या माळा
दे ना पटकन
मखमाली झुल
घाल पटकन
चांदीचे तोडेही
चढव गं पायी।।2।।
शोभतो मी भारी
शेतकरी छोटा
माझ्याच बैलांचा
मान लई मोटा
बक्षीस मिळेल
मला त्यांच्या पाई।।3।।
बैलजोडी माझी
दिसायला छान
ढवळ्या पवळ्या
आहे माझी शान
जीव माझा गुंते
त्यांच्यातच बाई।।4।।
शेतकरी राजा
पोशिंदा जगाचा
त्याच्याही आधी
मान हा बैलांचा
करू त्यांची सेवा
होण्या उतराई।।5।।
