स्वाभिमानी म्हातारी
स्वाभिमानी म्हातारी
एक स्वाभिमानी परंतु
भुकेली म्हातारी
फिरत होती इकडे तिकडे
नजर तिची भिरभिरी
दोन दिवस तिच्या सुनेने
दिली नव्हती भाकरी
आजपर्यंत कोणापुढे कधी
पसरला नव्हता हात
पण आता म्हातारपणी
शरीरही देईना साथ
एका ओसाड एसटी स्टँड
वर फिरत होती पिरी पिरी
अशी एक स्वाभिमानी
परंतु भुकेली म्हातारी
इकडे तिकडे मान वळवुनी
व्याकुळतेने पाही
वडापावची गाडी बघून
जिभळ्या चाटत राही
कोणाकडे न मागता भिक
भुकेचा आगडोंब सोसत राही
अवस्था तीची दिनवाण्या
कुत्र्यापरी
अशी होती एक स्वाभिमानी
परंतु भुकेली म्हातारी
एक पांथस्थ तिची ही
अवस्था हेरी
जाणूनबुजून विसरला
तिथेच आपली शिदोरी
झडप घालून बका- बका
खाऊ लागली म्हातारी
दुरुन न्याहाळी पांथस्थ
समाधान त्याच्या चेहऱ्यावरी
अशी एक स्वाभिमानी
परंतु भुकेली म्हातारी
