सूर नियतीचे जुळताना
सूर नियतीचे जुळताना
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले रडता रडता हसताना
तेव्हा उमगले माझ्या मना
दिलीस का तू वाट मोकळी आसवांना....
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले बंधनात जखडताना
तेव्हा कळले माझ्या मना
स्वीकारले का तू अमान्य बंधना....
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले मूर्तरूप साकारताना
तेव्हा समजले माझ्या मना
कोरलेस का तू अमूर्त शिळांना....
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले हक्कासाठी लढताना
तेव्हा अनुभवले माझ्या मना
घडवलेस का तू अनेक भविष्यांना....
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले खडतर जीवन जगताना
तेव्हा अवगत झाले माझ्या मना
सोसलेस का तू असह्य वेदनांना....
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले मुक्त श्वास घेताना
तेव्हा ज्ञात झाले माझ्या मना
फुलवलेस का तू नाजुक कळ्यांना...
.
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले बंधनमुक्त होताना
तेव्हा ध्यानी आले माझ्या मना
जखडून का होतीस अपवित्र बंधना....
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले भरारी घेताना
तेव्हा गमले माझ्या मना
झुगारलेस का तू अन्यायी बेड्यांना....
सूर नियतीचे जुळताना
तुला पाहिले हसता हसता रडताना
तेव्हा माहित झाले माझ्या मना
दिलीस का तू वाट मोकळी आसवांना....
