स्त्री
स्त्री
ती कोण?
ती रे ती *स्त्री*
तुझ्या आयुष्यात चांदणे शिंपडीत जाणारी..
आई, ताई, सखी, जीवनसंगिनी,
तर कधी लेक बनून.....
पण तुला कळलंच नाही.....
कधी त्या सुंगंधित सड्याच्या,
परीमळाचं कारण...
कारण तुझ्यालेखी ती म्हणजे
क्षुल्लक प्रकरण....
तर कधी आयुष्याला लागलेलं ग्रहण...!
जाणलंस का कधी आईचं वात्सल्य?
तिची काळजी कटकट वाटायची तुला..
पण तुझ्याच सुखासाठी जीव तिचा आसुसलेला...
बहिणींचं निरागस प्रेम,भांडण
म्हणजे नसता त्रागाच ना तुझ्यालेखी..!
पण त्रयस्था सोबतच्या वादात मात्र,
तुझी नि तिची एकी...!
कधी ती म्हणजे मित्रमेळ्यातील सुगंधी दरवळ
तर कधी दुरावल्या मैत्रीला जोडणारी हिरवळ
तुझ्या आयुष्यातील *ती* म्हणजे..
संपूर्ण समर्पण..
जगातली सारी सुखं तुझ्याच साठी अव्हेरणारी
'इदं न मम्' म्हणत सारंच तुझ्यासाठी करणारी..
अन् ते तुझ्या संसारवेलीवर उगवलेलं ,
गोंडस इवलं चैतन्य रुपी फूल..
जीवनातला सारा आनंद एकवटून,
तुमचं आयुष्य फुलवणारं.....
प्रत्येक रुपात असते ती
कधी जीव लावणारी, कधी जीवाला जीव देणारी..
कधी छत्र धरून तर कधी छाया बनून..
ओळखायचं असतं तिचं प्रेम, तिचं समर्पण...
ओळखतांना तिला खुलं ठेव मनाचं दर्पण...!
ओळखायचं असतं तिला प्रत्येक रुपात
चुकली जर ती, येतात वादळं आयुष्यात..!
म्हणूनच तिला जाण रे अंतर्मनातून
कर तिचा सन्मान तुझ्या वर्तनातून...!
