समर्पण
समर्पण
वास्तवाच्या निखाऱ्यावरही
शिंपडलेस स्नेहाचे तुषार
काळजात जपत राहिलीस
स्वप्नांचे रंगीत ताटवे
तेव्हा आता कुठे येऊ लागलेत
क्षण आनंदाचे कवेत
मिसळत गेले ऋतूंचे लपंडाव
वर्तमानातील क्षणांची पानगळ होताना
एकटेपणातही जोपासला
भेगाळलेल्या मातीचा संयम
अंतरंग उसवत असताना
भावमुग्धपणे बोबड्या शब्दांसाठी
नात्यांमध्ये विश्वास पेरत राहिलीस
म्हणून घरात दरवळतो आपुलकीचा सुगंध.
दिसते तूझ्यात एक सरिता
प्रत्येक खाचखळगे पार करत
अखंडपणे वाहणारी.
झुकतात संकटेही तूझ्या जिद्दीने
कारण राबराब राबत राहतात
तूझे दोन हात रात्रंदिवस
कुटुंबासाठी
तुझ्या कर्तुत्वाच्या स्वागताला
शब्दफुले पुरेशी नाहीत.
म्हणून माझ्या आयुष्याचे समर्पण
तूझ्या प्रत्येक क्षणासाठी
