माणूसपण
माणूसपण
विचारांच्या जुगलबंदीत
अंतिम शब्द सापडत नाही
तत्वांचे ग्रंथ चाळूनही कोठे
माणूसपण सापडत नाही
व्यवहार असा अर्थाने बांधला
की प्रेमाचीही बोली लागते
मातीत विखुरलेल्या बियांना
मात्र तेजाची पालवी फुटते
उमलत्या कळ्यांची स्वप्ने
स्वार्थाचे हात खुडून टाकतात
माणसांना माणूसपण खरेतर
झाडे अन् वेली तर शिकवितात
प्रश्न राहतो अनुत्तरित जगण्याचा
तेव्हा सूर्यतेज घ्यावे अंगावर
शुद्ध बीजापोटी फळे गोमटी
जाणीव रूजवावी काळजावर
दोष मुळीच नसतो मातीचा
बदलते हवामान नित्य सारे
भूतकाळाच्या जखमा गोंजारून
कुठे पीक डौलाने डुलते का रे?
