समिधा
समिधा
लग्न करताना त्यानं विचारलं ,
" नोकरी करशील ? "
"हो " म्हणाली.
" पण मग घराचं,माझं कसं काय ?"
"सारं आनंदानं करेन " म्हणाली.
घड्याळीचा काटा अन तिचं सख्य जमलं,
तारेवरची कसरत करीत आयुष्य दमलं..
आनंदित ठेवण्यासाठी त्याला,
चेहऱ्यावर उसनं हसू
इच्छा गाडून कधीच जिरवले
डोळ्यातले आसू....
सर्वस्वाच्या 'समिधा' त्याच्यासाठी
समर्पित केल्या
तिच्या त्यागाचं तेजाळणं पाहून
तिची 'पहाट' अन 'संध्या'
निगर्वी झाल्या.....!
चाक उचलत संसारथाचं
जगणं तिचं गीता झाली
रामराज्य अन घर सांभाळता
तिची वनवासी सीता झाली.....!
एके दिवशी...
एके दिवशी,आयुष्याच्या संध्याकाळी
संसार अन नोकरी करीत
तगमग ,फरफट जीवाची झाली
अन घर ,नाती,पोरं सजवता
स्व श्रृंगार ,गळ्याची पोत विसरली....
घामाची माळ न दिसता
त्याला भोंडा गळा दिसला
'पुरुषी अहंकार' दुखावून
"मला विसरली ?" म्हटला....!
मनाच्या शवागरातून तिनं
वेदनांचं फूल केलं...
प्राणाची पंचारती देत
'हसू' ही त्यांच्याच नावी केलं....!
रुसलेल्या पतीसाठी....
पदरी पराजय स्वीकारत ती नत झाली
पुरुषी अहंकाराचीच काहो मग
जीत झाली..?
पण.....त्याला कधी कळेल का ?
की पैसा ,बंगला ,गाडीने
जरी तो परिपूर्ण आहे
पण अखेर तिच्याशिवाय
तो अपूर्ण आहे...अपूर्णच आहे ...!
