शृंगाराचे नखरे..!
शृंगाराचे नखरे..!
तू ग नारी आहेस ही सुकोमल
शृंगाराचे आजमावतेस नखरे तू अंमल....
खुलवतेस तू तुझे मूळचे अप्रतिम ते रूप
सोबतीला हास्याची लकेर शोभते खूप.....
मोगऱ्याची लड ती शृंगारा साठी सजते
कपाळावरची बिंदी उगाच खुदकन हसते .....
गालावरची खळी कमळासारखी फुलते
ओठांची गुलाब कळी नकळत मग खुलते....
हातातील काकणे किणकिण करतात नाजूक
काजळाची रेघ नजरेत भरतेस साजूक....
पायातील पैंजणाचा वेढा त्या पदकमलात
चालतेस घालून मग गजासारखी डौलात....
सोबतीला डोलतो सुंदर कानातील झुमका
भुरळ पाडतो तुझा हळुवार नाजूक ठुमका....
तुझाच तू शृंगार पाहून आरशात अचानक
लाजून चूर होतेस अन् डोळ्यात येते चमक......
अशी गं तू नार आहेस ही सुकोमल
शृंगाराचे आजमावतेस नखरे तू अंमल..!
