शिवरायांचा पाळणा
शिवरायांचा पाळणा
मुजरा करीते जीजाबाईला
वंदन त्या पवित्र गडाला
लागे चरण फाल्गुन वद्य तृतीयेला
जो बाळा जो जो रे जो जो..........१
शिवनेरीवर जन्मला बाळ
सूर्य उगवला झाली सकाळ
आनंद झाला जनासकळ
जो बाळा जो जो रे जो जो......२
ठेविले शिवबा तयाचे नाव
हर्षुन गेला सगळा गाव
आशीष देती रंक आणि राव
जो बाळा जो जो रे जो जो........३
धन्य माऊली बोले जीजाई
गूज मनीचे बाळ ऐकून घेई
कौतुके पाहून सुखावे आई
जो बाळा जो जो रे जो जो.........४
युद्ध खेळले जिंकण्या कारण
गनिमी कावा यशस्वी धोरण
मावळ्यांसवे बांधे स्वराज्य तोरण
जो बाळा जो जो रे जो जो........५
जाणता राजा हा नीतिवंत
भवानी मातेचा वरदवंत
पुन्हा न होणे ऐसा कीर्तिवंत
जो बाळा जो जो रे जो जो.......६
