शब्दांचे दडपण...
शब्दांचे दडपण...
रडीचा डाव रचला गेला मनात...
शब्दांचे दडपण आले स्वप्नात... ।।धृ ।।
बेफिकीर ती एक वेळ
डोक्यात क्षणांची भेळ
शब्द बेधुंद झाले माझ्या मनात... ।।१।।
मनात भीतीचा काहूर
जीवाला लागली हूरहूर
वेडी धगधग चाले श्वासात... ।।२।।
प्रश्नांचं कोडं विचित्र
उत्तरांचं रिकामं चित्र
अश्रूंची धार माझ्या डोळ्यात... ।।३।।
चंद्र रात्री भावुक भास
झोप उडवणारा राक्षस
शब्दवेडे स्वप्न रडले माझ्यात... ।।४।।
शब्द हरवण्याचा मूक थाट
शब्द रुसण्याचा दंग भयपट
विचारांची आली तगमग दुःखात... ।।५।।
शब्दांचं नसणं करेल घायाळ
शब्दांचं असणं भेदक जाळं
ठाऊक नव्हतं दडलेलं सत्य भयात... ।।६।।
शब्दांचे दडपण भित्र
भेटतील का ते शब्द मित्र
किती आहे चित्र विक्षिप्त... ।।७।।
वाटून गेलं सगळं मिटलं
भीतीनं अंग जणू शहारलं
मंत्रमुग्ध मन झालं व्याकुळतेत... ।।८।।
वाटलं यावी आता जाग
आनंदाची फुलावी स्वप्नबाग
घालमेल उत्सुकतेची दाटली उरात... ।।९।।
एक रात्र अशीही आली
झोप उडवून काहीशी गेली
एक शब्दस्वप्न लपवून गेली माझ्यात... ।।१०।।
