सांज
सांज
दाट रानी कडेकपारी
दडला तो दिस तम
महाकाय पंख पसरूनी
ये दूनिये वरती....
थरथरे सरितेचे जळ
संथ वाऱ्यावरती
विश्व तरुंच्या काळया
छाया कंपित होती....
पिंपळ पानामधूनी
क्षणभर पंख फडफडती
निःशब्द रान पाखरे
सरोवराकडे उडती....
दूर कुठेतरी
साद घालीती
रातकिड्यांचे स्वर
कानी घुमती....
निळसर श्यामल
अंबर वरती
दूरच्या अंबराईतून
चढूनी दिन तो मावळती....
धूसर धुरकट श्वेत
पारवा पिसारा झडती
निस्तेज चांदण्या
डोकावून पाहती....
पश्चिमेस शुक्रतारा
प्रकाश सारा विखुरती
शूर विरासम तो
आला पुढती....
क्षितिजास विडंबण्या
तेजोमय शुक्र दीप्ती
शहरामधल्या मिणमिणत्या
क्षीण दिव्यांची ज्योती....
भग्न असे देऊळ
अस्वस्थ असती
कर्तव्यनिष्ठ मानवा तव
जपून ठेवी ह्रदय मूर्ती ....
सळसळ पाचोळा करती
तरंग उठती डोहावरती
छनछन वाजे पाऊल
रजनीचे या जगावरती....
