रंग मोरपंखी इच्छापूर्तीचा.....
रंग मोरपंखी इच्छापूर्तीचा.....
रंग हा इच्छापूर्तीचा ....
रंग हा स्वप्नांचा....
रंग हा ध्येय गाठण्याचा....
रंग हा आत्मविश्वासाचा....
रंग हा शांतता, हुशारी आणि प्रसन्नतेचा....
प्रसन्न मुद्रा चेहऱ्यावरती
अन् उत्साह असतो तुझ्यात,
आत्मविश्वास आणि सकारात्मकतेमुळे
नेहमीच वेगळी दिसतेस तू साऱ्यात.....
परिधान करुन मोरपंखी रंग
तू मयूर बनून आलीस,
विखुरलेले सर्व रंग
तू एकत्र गुंफूनी आलीस....
एक एका रंग छटेत
दडलाय अर्थ तुझ्या गुणांचा,
तुझ्यासवे पूर्ण होत आहेत मनोरथ
माझ्या स्वप्नातील जाणीवांचा.....
सजवून मयूर पंखांना
जेव्हा अवतरलीस तू भूवरी,
घननिळ्याची बासरी मज
साद देई अंतरी.....
मोरपंख कान्हाला का प्रिय
आज मला उमगले,
निळाईने नटलेल्या मोरपंखी रुपात
जेव्हा मी तुला पाहिले....
शांत, सालस, गोजिरवाने
रुप असे लाघवी,
पाहूनी रुप तुझे हे मनोहर
कान्हाची बासरी मज आठवी....
नेहमीच करुनी माझ्या स्वप्नाची पूर्तता
लळा मज लावतेस,
तुझ्या या मायेच्या छत्राखाली मग
अलवार मी सामावते....
डोळ्यात जेव्हा तुझ्या
स्नेहाचे बरसतात मोती,
आपुलकीच्या जाणीवेने
पावन होतात
मना मनातल्या ज्योती.....
हास्याचा साज चढवूनी
सुखाची तू करतेस उधळण,
सुंदर तुझ्या हास्यामध्ये
गळून जाते माझे मी पण.....
आजच्या या मोरपंखी रंगात
खुलून दिसतेस तू छान छान
घननिळ्याच्या बासरीची
आहेस तू आजही शान.....
रंगाची अशी उधळण करीत
रोजच तू समोर यावे,
रंगाचा हा उत्सव तुझ्यासवे
मी आजन्म अनुभवावे....
रंगाचा हा उत्सव तुझ्यासवे
मी आजन्म अनुभवावे....
