रे मना..
रे मना..
आज माझं मन म्हणालं, 'अगं माझ्याकडे जरा बघ!'
कधीतरी मनापासून निरखून बघ मनाचंच जग...
घटक्यात सांगू पाहतं मन 'अगं जरा धीर धर',
अन् पुढच्याच क्षणी म्हणे 'उंच आकाशी पंख पसर..!'
कधी त्याला वाटे कडाडणाऱ्या वीजांची भीती,
अन् कधी मात्र म्हणे 'पावसात चिंब भिजत बहर!'
मनाचे आहेत एकाहून अनेक निराळे चेहरे,
काही बाहेरचे, काही आतले, काही मधले असे सगळेच वेगळे..
कधी त्याला असते फक्त स्वतःची अन् स्वतःची फिकीर,
अन् कधी फक्त पाहायची असते दुसऱ्याच्या चेहेऱ्यावरची आनंदी लकीर!
कसं सांगू पण मनाची थोडी करता येते व्याख्या !
अरे मना, तूच सांग कसं तुला बांधून ठेऊ रे सख्या ?
कधी कणखर, कधी हळवं, कधी कसं स्पंदेल याची नसते हमी,
म्हणूनच की काय भलेभले सांगतात, 'मनाच्या वेगापुढे सारेच वेग कमी'...
