पंचवीस वर्षे नात्याची
पंचवीस वर्षे नात्याची
लग्नाच्या सुरुवातीला होतास तू
इतरांसारखाच उद्दाम उर्मट मुजोर
सतत मला समजायचा कमजोर
आणि तू मात्र व्हायचा शिरजोर
तुझी अपेक्षा असायची
फक्त मम म्हणायची
आणि माझी ही धडपड असायची
स्वतः मधले स्वत्व जपायची
मग भांड्याला भांडी
रोजच लागायची
हळूहळू दोघांमधला
मीपणा कमी झाला
आपल्या संसार दहा
वर्षाच्या टप्प्यावर आला
आता आपण दोघांचे
झालो होतो चौघे
चिमुकल्या भोवतीविश्व
गुंफले होते अवघे
असाच हळूहळू मग
टप्पा वाढत गेला.
कधी भांडण कधी प्रेमाने
संसार असा केला
पंधरा झाले वीस झाले
कमी झाली हळूहळू अढी
संसाराची आता खरी
कळू लागली गोडी
नाटक, सिनेमे, सहली
यात दिवस गेले भर्रकन
कधी नातेवाइकांचे
लग्नकार्य
कधी तुझे माझे आजारपण
असे करता करता
गाठला 25 वर्षाचा टप्पा
अधून-मधून अजूनदेखील
तुझी मर्जी होते खप्पा
तुझा पुरुषी अहंकार अजून
काढत असतो फणा
मी पण अजुन ताठ
ठेवला आहे माझा कणा
