पांचाली
पांचाली
ती द्रौपदी ती पांचाली
ती पाचांची भोग्या झाली
मातेची आज्ञाप्रमाण मानून
भिक्षेसारखी वाटून घेतली
कोणी तिच्या मनाचा
विचार नाही केला
काय वाटत असेल
द्रौपदीच्या मनाला
शरीराने एक झालीही असेल
परंतु काय तिच्या मनाचे
तिने स्वयंवरात पाहिले होते
फक्त रुपडे अर्जुनाचे
पाचांची मर्जी राखता राखता
तिची दमछाक होई
तरी मात्र प्रत्येक जण
तिच्या निष्ठेवर शंका घेई
पाच मुले पाचांची
पण होती फक्त द्रौपदीची
त्यांच्या संगोपनाची
जबाबदारी तिच्या एकटीची
कारण प्रत्येक पांडवाने
वेगळा संसार थाटला होता
तरीही त्याच्या वाटणीचे
वर्ष मात्र विसरला नव्हता
पाच पराक्रमी पती असून
वस्त्रहरणाची वेळ तिच्यावर आली
पतींनी हात वर केले मग
स्वतःसाठी स्वतःच लढली
रडली नाही खचली नाही
कर्तव्याची जाणीव दिली प्रत्येकाला
घेण्या अपमानाचा बदला
घडवून आणले महाभारताला
