नव्या युगाची हिरकणी
नव्या युगाची हिरकणी


काय आणि कशी वर्णू
सखे आपली गाथा
अनंत काळची माता तू
समोर टिकतो माथा
आई बहीण मुलगी प्रियसी भार्या
सांगु तुझे किती रूप
सहनशीलतेचा दुर्दम्य गड तू
तुझ्या निरपेक्ष प्रेमाचं नेहमीच अप्रूप
तूच गार्गी तूच अनुसया
अन्नपूर्णा ही तू अन् तूच अहिल्या
एकाहून एक सरस कथा
समस्त सृष्टीत व्यापल्या
तूच ती रणरागिणी जी
समरांगण गाजवी
ममतेचाही अखंड झरा तूच
जी गाई अंगाई ओवी
तूच दामिनी लखलखणारी
>मनमोहक तूच गाजगामिनी
धगधगत्या निखऱ्यास पदरी घेवून
जगणारी शिलतेची स्वामिनी
मनास रिझवणारी काय झिजवणारी
मैफिलीची शान आणि मंदिराचा कळस
घराला घरपण आणि देवाला देवपण देणारी
तूच अंगणात दिमखाने डोलणारी तुळस
तोडल्या शृंखला बंधनाच्या
चल झेप घेवू आकाशी
देदीप्यमान करू आयुष्या सारे
मग कसे होवु आपण "नकोशी"
अस्मितेची मशाल अंत रंगी जपू
सौंदर्याची लावण्यखणी
मातृत्व ,कर्तृत्व आणि अस्तित्व जपणारी
नव्या युगाची तूच हिरकणी