निसर्ग प्रेम
निसर्ग प्रेम
निसर्ग माझा सखा सोबती,
तरू, लता संगतीत मन माझे रमते,
निसर्ग प्रेमावर काही बोलू म्हणते,
इंद्रधनूची सप्तरंगी कमान पाहत बसते!
सागराच्या कुशीत शिरता,
शांत होई अवखळ तटीनी
त्यांच्या या प्रेमावर काही बोलता,
प्रेमाचे त्यांच्या,रंग दिसती गगनी!
कमलिनीत शिरुनी मधूप्राशिता,
कमळमिठीत भृंग बघ बंदी होई,
अजब प्रीत ही तयाची,
प्रेमावर त्यांच्या बोलू काही!
प्रीत पतंगाची असते खरी,
प्रेमासाठी झेप घेई दिव्यावरी,
त्याची ठावे जळेल हे शरीर,
या प्रेमावर काय बोलू तरी !
पाहताच सावळा हरी,
लाजते राधा नाजूक गोरी,
प्रेमावर तयांच्या बोलू काय?
राजरोस त्यांना भेटण्याची चोरी!
आई बाबा पिलांवर माया करिती,
प्रेमभराने पालन करिती,
चोचीत सुखाचा घास भरवती,
यांच्या प्रेमावर बोलावे किती?
