निर्व्याज बालपण
निर्व्याज बालपण
निर्व्याज बालपण
ते खळखळ वाहते पाणी।
तो निर्झर गातो गाणी।
ती चिवचिव करती चिमणी।
बाळपाखरे गोजिरवाणी॥
पाण्यात सुखे डुंबण्याचा।
स्वैर पाणी उडवण्याचा ।
आनंद कैफ चढण्याचा।
मदमस्त जीवन जगण्याचा॥
बालपणीचे हे निर्मळ सुख।
नच त्यांस पक्वान्नांची भूक।
करिती एकदुज्यांचे कौतुक।
जपती रेशीमबंध नाजूक॥
ना जीवनात कसली खंत।
ना खेळातून ह्यांस उसंत।
आनंद उचंबळतो दिगंत।
हेच देवाघरचे भाग्यवंत॥
हा बालपणीचा ठेवा।
मनोभावे जतन करावा।
करू द्यात किती, कुणी , हेवा।
मैत्रीचा हात कधी न सोडावा॥
मन निर्मळ आरस्पानी।
मन जलाशयातील पाणी।
मन जलतरंग , तुषार जीवनी।
मन बुलबुल पक्षी, गाई गाणी॥
मन प्रसन्न ठेव तू देवा।
मन बनू देत चिमणा रावा।
चिमणपाखरांसंगे नाचावा।
ह्या निर्झरात सचैल नहावा ॥
हे सुख कधी न सरावे।
बालपण कधी न हरावे।
वय जरी किती वाढावे।
निज शैशवास नित्य जपावे॥
