मोरपंखी प्रेमस्पर्श
मोरपंखी प्रेमस्पर्श
प्रीतसरीत श्रावणी साजना
धराही चिंब-चिंब नाहली
हाय भडकलाच तो वन्ही
वणवाच ती चेतवून गेली... ||१||
ये,विरहाचा विरह होऊ दे
उबारा श्वासांचा देई मंद
अधरदली भ्रमर होऊनी
अलवार होशील ना बंद! ..||२||
शहारलेल्या उधाण आले
गोठली,भारली बघ निशा
मंद - मंदश्या चाहुलीने
रोमारोमांत चढली नशा... ||३||
कोण अधीरता उमळली
नच सरावी धुंद यामिनी
साद तुजला घालताती
नाद ही कंकण-पैंजणी... ||४||
काया ही अधीर उमलण्या
मोरपंखी स्पर्श दे अधरी
पुन्हा पुन्हा मग उचंबळते
लाट या चातकी तनुवरी... ||५||
प्रीत सुमनांच्या सेजेवरती
प्रेमजळी शब्दही भिजले
प्रितीच्याच चरणांवर मी
मलाच वाहून रिती जाहले...||६||
मिसळून रे तुझ्यात न कळे
जगी कुण्या अनोख्या वावरते
मिठीत तुझिया थिजूनी जाता
सखी तुझी साजना बावरते..|| ७||
करीन बहाणा मी अधरांचा
लटकलाज आणूनी डोळ्यांत
पांघरुन तूही तनूस माझिया
मधुगंधी होऊ दे प्रणयरात...||८||
