मैत्रीचा सातबारा
मैत्रीचा सातबारा
आभ्या, दिप्या, सोन्या, मुन्ना.
मैत्रीच्या इस्टेटीचे खरे वारसदार.
कोणीही कितीही दाखवावा हक्क
कोणीही द्यावा मनाला आधार..
बालवाडीतच नोंद लागली यांची
माझ्या मैत्रीच्या सातबा-यात.
बोबड्या बोबड्या शब्दात
जुळलं निस्वार्थी हे नातं.
जिवाभावाच प्रेम अनोखी
खोललं आमच्या मैत्रीचं खातं
कधी गट्टी तर कधी कट्टी.
पण एकमेकांची असे साथ पक्की.
घराच्या अंगणापासुन,
शाळेच्या प्रांगणापर्यंत..
रोजच असायची दंगामस्ती..
कधी सुरपारंब्या तर कधी विटीदांडू.
कधी लपंडाव तर कधी चेंडू..
सार कसं अवखळ निरागस.
ना कपट ना मनी कसला स्वार्थ
लहानपणीची मैत्रीच असे सालस.
वेळ आणि जबाबदारीने घात केला
स्वच्छंदी काळ कसा बदलत गेला.
पण मैत्रीचा उतारा तोच राहीला.
गाडी आली, बंगला आला
पण खरा आनंद मात्र मैत्रीनेच दिला..
मैत्रीच्या आठवणींचा तो सातबारा.
आज डोळ्यात नव्याने तरळून आला.
नकळत पापण्यांच्या कडा ऒलावून गेला..
