माणुसकीची गुढी...
माणुसकीची गुढी...
आज गुढीपाडव्याच्या
औचित्याने घेऊ आण...
बदलांना स्वीकारून
जपू संस्कृतीचे ऋण... ।।१।।
आज करून संकल्प
माणसाला मान देऊ...
मना मनातील गुढी
विवेकाने हाती घेऊ...।।२।।
जात, पात, धर्म, भेद
पळवून लावू भूत...
राहू सर्व मिसळून
एकोप्याने साधू सूत... ।।३।।
लिंगभेद स्वीकारून
नको कुणास दूषण...
डावलून विषमता
जपा ‘मन’ आभूषण... ।।४।।
राग, द्वेष, लोभापायी
नको बळी भावनांचा...
मनी स्नेहभाव ठेवा
निरागस विश्वासाचा... ।।५।।
सदा निर्मळ विचार
राही निवास मनात...
शान आहे गौरवाची
फक्त माणूसपणात... ।।६।।
मना मनास ओळखा
माणुसकी मनी धरा...
परिवर्तनाचे स्वप्न
भव्य गुढीत साकारा... ।।७।।
