माझी गौराई
माझी गौराई
1 min
143
आज माझी गौराई,
आली पहा घरी,
दीड दिवस रजा घेऊन,
आली ती माहेरी.
तेरड्याचा फुलोरा तुझा,
मुख बनवले रुईवर,
सुपात सजवून तुला,
आणले पहा वेशीवर.
वाजत गाजत येशी तू,
वेशीवरून घरा,
ओवाळती तुला,
माहेरवाशिणी दारा.
पाऊले तुझी उमटता,
चैतन्य नांदे घरी,
गोडाधोडाचे नैवेद्य करते,
गौराई तुझ्या साठी खरी.
दुसऱ्या दिवशी ओसा तुझा,
सूप मी ओवसते,
तुझ्या निमित्ते मला पण जरा,
माहेरपण गवसते.
पिठाचा तुझा भंडारा,
दागिने पिठाचे करते,
सौभाग्यच लेणं आई,
तुझ्याकडे मागते.
