कविता
कविता
अंतरीची मंद झुळूक अन्
भयानक वादळांनाही साकारते,
माझी कविता अक्षरांच्या रूपे
शब्दमौक्तीकं होऊन चकाकते...
आसू-हसूंना किती सांभाळून
सांत्वनही जीवाजतन करते,
कवितेचे सेवक आम्ही
भावार्थ जीवनाचे रेखाटते.....
सखी,सहेली अन् लंगोटयार
माझी कविता माझा आत्मानंद,
फसव्या या रंगमंचावर खरेच
हक्काचा पण अलिप्त स्वानंद...
मानसिक समाधानाची गुरूकिल्ली
हलके करीतसे श्वासांचे भार,
चालताना मार्गदर्शन करीतसे
सुखकल्लोळाचे करूनी वार...
तिनेच तर मजला मनमुराद
हसायला शिकवले,
मनावरील प्रहार सहजच
शब्दात कैद केले.....
खूप मौलिक आहे ती माझ्यासाठी
हर प्रसंगात साथ निभावते,
मी तर सेविका कवितेची
क्षणक्षण तिच्या संगती रमते...
