कप बशी
कप बशी
1 min
362
माझं नाव तुझ्याशी कायम जोडलेलं
जशी प्रत्येक पुरुषापाठी स्त्री
तशीच तुझ्यासाठी मी...
नाविण्याने परीपूर्ण
तुझा रंग, आकार, रुप
मीही तुला साजेशी.....
तू माझा कप मी तुझी बशी
हवाहवासा वाटतो
तुझा उबदार स्पर्श
वाफाळलास कि तापतोसही फार
मग मीच होते तुझा आधार
कधी वर कधी खाली
सोबत तुझ्या तुला हवी तशी
तू माझा कप मी तुझी बशी
किती जन्मांची सोबत ही
आठवतही नाही...?
आजकाल तु तुला
माझ्यात साठवत नाही
"आजन्म साथ देईन"
म्हणालास खरं
कुठे शिंकली रे माशी
तू माझा कप मी तुझी बशी
अजून थोडा काळ
तुझ्यासाठी थांबायचं होतं
रिकामीपणाचं दुःख
तुझ्या कानात सांगायचं होतं
तुझीच चर्चा जागोजागी
वाढतो रे दुरावा माझ्या नशिबी
तू माझा कप मी होते तुझी बशी
