कल्पनेचा कुंचला
कल्पनेचा कुंचला
1 min
11.4K
तुझ्या कल्पनेच्या कुंचल्यातून
का साकारलीस माझी प्रतिमा |
उधळून सारी प्रतिभा तुझी
तिला उरली न कुठली सीमा | |१ | |
कुंचला तुझा किती अद्भुत
त्याची काय वर्णू महती |
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
सारे संभ्रम तेथ प्रकटती | |२ | |
कल्पनेचा तु उद्गाता तुला
अंत असेना ना लागे पार |
तूच घडविशी तूच मोडीशी
देवा तूच खरा वेडा कुंभार | |३ | |
कल्पनेच्या कुंचल्यातून
करशी काय रे साकार |
उगाच नाही तुला म्हणती
देवा तु निर्गुण, निराकार | |४ | |
