STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

5.0  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

काजवा

काजवा

1 min
41.9K


एकदा एक काजवा, खूप - खूप मातला

सूर्याचं स्थान घेण्याचा, त्याने घाट घातला


सूर्य जेव्हा एकदा, ढगाआड गेला

कांगावखोर काजवा म्हणे, पहा सूर्य मेला


आहे म्हणे आता, मीच तुमचा नेता

नमस्कार घालत जा, मला येता - जाता


प्राणी, पक्षी, फुले, पाने सारे लागले हसू

ढगाआडून सूर्य जेव्हा, पुन्हा लागला दिसू


चेहरा काजव्याचा तेव्हा, पाहण्याजोगा झाला

लाज मात्र जराशीही, वाटली नाही त्याला


सायंकाळच्या वेळी जेव्हा, सूर्य गेला घरी

काजवा म्हणे हीच आहे, संधी मला बरी


सांगत सुटला सा-यांना, तो सूर्य आता संपला

आता तरी सा-यांनी, राजा म्हणा मला


सांगू लागला सा-यांना, तो सूर्याची दुष्टाई

खटकली सा-यांना, त्याची ती शिष्टाई


म्हणे सूर्य सा-यांना, प्रकाश देत नाही

आहेत त्याच्या मर्जीतले, खास त्याचे काही


त्यांच्यावरतीच तो, जास्त काळ तेवतो

इतरांना मात्र, तो अंधारात ठेवतो


माझ्याकडे पाहा, मी कित्ती -कित्ती चांगला

तुम्हा देण्या प्रकाश, मी जीव माझा टांगला


संपला आता सूर्य, आणि त्याची जुलमी राजवट

करुन टाकला आहे कायमचा, मी त्याचा पत्ता कट


राहतील सारे सुखात, दुःखी कोणी नसेल

आत्ता मी म्हणेल तीच, पूर्व दिशा असेल


वटवट ऐकून त्याची, सारेच वैतागले

लवकर येण्याची सूर्याला, विनंती करू लागले


झाला पुन्हा सूर्योदय, काजवा हिरमुसला

पुन्हा सूर्यास्त होण्याची, तो वाट पाहत बसला


आजपर्यंत सुरू आहे, हाच दिनक्रम

काजव्याच्या मनामध्ये, आजही आहे भ्रम


मजपुढे त्याला मस्तक, नमवावे लागेल

एक दिवस सूर्याला, पराभूत व्हावे लागेल


वाटते त्याला आपल्याशिवाय, पानही हालत नाही

आता मात्र काजव्याला कोणीही, भीक घालत नाही


Rate this content
Log in