काही तरी हरवलं
काही तरी हरवलं
शून्य नजरेने आकाशात पाहत
भूतकाळात जरासे डोकावलं
तेव्हा कोठे मला जाणवलं की
माझं काही तरी नक्की हरवलं
बालपणीच्या मित्रांसोबतचा वेळ
मैदानावर दिवसभर खेळलेला खेळ
सायंकाळी चौकात खाल्लेली भेळ
सारं चित्र सर्रकन डोळ्यांपुढून सरकलं
माझं काही तरी नक्की हरवलं
शाळेत मित्रांसोबत केलेली खोडी
पावसाच्या पाण्यात सोडलेली होडी
उगीच पोरांपोरीची लावलेली जोडी
डोळ्यांत पाणी येतंय जेव्हा हे आठवलं
माझं काही तरी नक्की हरवलं
मित्रांपुढे सारे जग फिके फिके वाटे
मित्रांला दुःखात पाहून मनी दुःख दाटे
घाबरलो ना वाटेवर असो कितीही काटे
जिवाभावाच्या त्या मित्रांना दुरावलं
माझं काही तरी नक्की हरवलं
