इंद्रधनू
इंद्रधनू

1 min

12.2K
निसर्गाच्या पटावर
सप्तरंग उधळीत
अवतरे रविराज
पूर्वदिशा उजळीत ||१||
सोनसळी हे किरण
अंगणात उतरले
सोन पिवळ्या रंगात
दवबिंदू मोहरले ||२||
परसात ताटव्यांना
गोड गुलाबी बहर
सकाळच्या प्रहरात
बहाव्यांचा हा कहर ||३||
रूप खुलले सांजेचे
सतरंगी पदरात
इंद्रधनू लावी गाली
सूर्य लाजला नभात ||४||
पावसाच्या आनंदात
वसुधेस रंग चढे
वस्त्र हिरवे लेऊन
वाजे हर्षाचे चौघडे ||५||
लपंडाव तारकांचा
चाले कसा नभांगणी
चंद्रासंगे रजनी ही
सुखावते तारांगणी ||६||
माझ्या दारास लागले
इंद्रधनुचे तोरण
सूर्य, तारे, चंद्र, वारे
दिले यांस आमंत्रण ||७||
होई जागा मानवा तू
नको करू परिहास
झाडे लावून धरू या
पर्यावरणाची कास ||८||