हरवलेला उषःकाल
हरवलेला उषःकाल
माझ्या अंगणात पहाटं पहाटं,
कसं दाटलं धुक्याचं सावट .
थंड बोचरा वारा तो चावट,
करीत होता अंगाशी लगट .
पांदीतील ती किर्रऽऽ वाट,
तिमीरपदराचा ओढीतसे काठ.
ह्या जन्मीची तुझीमाझी गाठ,
चालते मी तुझ्याच पाठोपाठ.
दारी तुळशी वृंदावन थाट,
त्यात न्यारी तुळशीची ऐट.
अखंड तेवते त्यात तेलवात,
संस्काराची प्रभा पसरे थेट.
मंद सुगंध दरवळ लाट,
धूप अगरबत्तीचा लोट,
करी अशुभा नायनाट,
प्रसन्न वातावरण ते होत.
पसरोनी दोन्ही प्रकाश कर ,
उदो झाला पूर्वदिसे दिनकर.
उल्हासाची धरा देतसे झालर
नटून नवती लेवून कनकभार.
गाईम्हशी गोठ्यात हंबरून,
वासरू पाड्याला पुकारत.
मन तीचं जाई कसं मोहरून,
पाहता पिले तिची आंचळात.
मनसोक्त पिले ती दूध पिऊन,
हळूच मग कासेतून काढता,
देती आनंदे मग मज दोहहून,
शांत स्थीरचित्ते न आनमानता.
गृहीणी करीती सडासंमार्जन,
रेखूनी रांगोळी मंगल नक्षीदार .
पुरूषांचे चाले प्रातः पुजार्चन,
देवा मानूनी दिवसाचा साक्षीदार.
मिळेल का हो अशी आता,
पाहायला उत्साही दिनचर्या.
आळशी झाला जो तो आता,
झाला वंचित उषःकालीन सौंदर्या.
