आला आला श्रावण...
आला आला श्रावण...
आला आला श्रावण मास ,
दाटला मनी माझ्या उल्हास....॥ध्रु॥
आहे लावून डोळे वाटेस ,
माहेरून येईल भाऊ नेण्यास .
उतावीळ केव्हा भेटेन बाबास,
गच्च मिठी मारेन आईस....॥१॥
पिंगा घालती गोड आठवणी,
जमायचो पंचमीला साऱ्याजणी .
काढायचो मेंहदी रात्र जागूनी,
नाना फुले ठिपके साजे चांदणी....॥२॥
घेऊन शेजारच्या काकू मावशीला,
आई अन् मी जातसे वारूळा .
लाह्या दुधाने त्या पुजी नागोबाला,
परिवार रक्षणा विनवी नागदेवाला.....॥३॥
उंच झोका वृक्षी असे बांधलेला,
सखीसह घेई मी झोका जोषाने ,
जीव घाबरा,फिरे गोळा पोटातला,
वर वर जाता झोका वेगाने.....॥४॥
गावचौक सख्या सवाशींनीनी भरलेला,
करीत गोल रिंगण फेर धरण्याला .
फेरासह नवरंग भरे गरगर फुगडीला ,
साऱ्या गाती चल गं सये गाण्याला .....॥५॥
येता श्रावण शोधी मन भूतकाळास,
सुखदुःखासवे खेळ खेळे उन पाऊस .
मन वढाय केव्हा जाईन मी माहेरास,
उतावीळ मन स्वच्छंदे वागण्यास .....॥६॥
