STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
545

मराठी नव वर्षाची

आली चैत्र प्रतिपदा  

सोनपिवळया स्पर्शाची

चैतन्यमयी संपदा


वसंताच्या स्वागतास

पळसफुल मोहरे

सृजनाच्या आनंदात

गुलमोहर बहरे


मराठमोळा जल्लोष

हर्ष नवा वर्ष नवे

प्रेम वाढवू मनात

विसरून हेवेदावे


चैत्राच्या या उन्हामध्ये

बहर हा चैतन्याचा

सण मराठी मनाचा

कलश तो मांगल्याचा


माझे अंगण नटले

दारी तोरण चढले

सुगंधित आनंदाचे

नाविन्यच शिंपडले


पल्लवी उद्याच्या आशा

उंच आभाळी ही गुढी

मनास मिळे उभारी

सोडू मनातील अढी


रेशमी वस्त्र लेऊनी

कडूलिंबाची डहाळी

साखरगाठ माळूनी

आम्रपर्णाची नव्हाळी


आला आला सण आला

गोडव्याचा शिडकावा

नव हर्ष उल्हासाचा

असा हा गुढीपाडवा


Rate this content
Log in