ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
भारताच्या गावांची रे
रम्य मंजूळ ती पहाट
वासुदेवाच्या मधूर वाणीनं
न्हाते अमृत वर्षावात . . .॥१॥
दिसारंभीच ते श्रवण
विठू नामाचा गजर
मन होई रे प्रसन्न
कर्णमाधुरी तो स्वर. . .॥२॥
भास्करही तो प्राचीचा
डोकावतो डोंगरातून
त्याच्या सहस्त्ररश्मींनी
घालतोया दिव्य स्नान. . .॥३॥
धरणीच्या देहावरी
जळ झुळुझुळु वाहे
तान्हलेल्या चराचरांची
नदीमाय वाट पाहे . . .॥४॥
पाखरांची किलबिल
कुठे मोर ते नाचरे
गंध चंदनी दरवळ
का न होई मन बावरे. . .॥५॥
येता जाता रामराम
बंधुभाव ठायी ठायी
प्रसंगे मग तो वैरीही
मदतीला धावून येई. . .॥६॥
रक्ताच्या नात्यांहूनही
मायेच्या त्या शेजारणी
शुद्ध प्रितीचाच झरा
सदा वाहे त्यांच्या मनी . . .॥७॥
माझा शेतकरी दादा
दिन रात्र राबतोयं
न्हातो घामांच्या धारांत
मोती पीक काढतोयं. . .॥८॥
अवखळ चंचल उनाड
वारा छेडतो अंगाला
साजनाच्या आठवाने
जीव सखीचा भुलला. . .॥९॥
खरी श्रीमंती सृष्टीची
खेडेगावाच्या मातीत
हरवलेला हा सुगंध
विदेशांच्या डोलार्यात. . .॥१०॥
