एकतर्फी प्रेम
एकतर्फी प्रेम
प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कशाला आणतोस आव
तिनेही करावे प्रेम म्हणून
विनाकारण आणतोस दबाव...
असेल तिचा नकार,
तर सोडून दे प्रेमाचा विचार
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार...
नाही म्हणाली तर....
का नाही म्हणाली याचा
आधी कर चांगला विचार
तिच्यासाठी स्वत:ला बदल
कशाला करतोस स्वैराचार...
गहाण ठेवू नकोस अक्कल
तुझी योग्यता, पात्रता बघ
तिने नाही दिली स्वीकृती
तुझी तर ही मानसिक विकृती
नको रे घेऊ उगाच तुझ्या
मूर्ख हट्टापायी तिचा बळी.....
काय मिळणार तूला मारून
एखादी उमलणारी कळी...
कशाला दाखवतोस तिला
उगीचच जिवाची भीती...
नसेल तिचा जर होकार
तर तूही घे अवश्य माघार,
कशाला मांडतोस वेड्या
असा एकतर्फी प्रेमाचा बाजार
जरा माणुसकी ठेव साठवून
हट्टाने कशाला देतोस पेटवून
आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले
त्यांना तू आज हे दिवस दाखवले
पेट्रोलने जळालेल्या शरीरास
अंतरीच्या वेदनांना जाळून
पुनः जाळावे लागले
पुनः जाळावे लागले.....!!!
