एक नवा श्वास पेरूया
एक नवा श्वास पेरूया
काल परवाचं पाहिल्यात मी
आरोपी माणसांनी केलेल्या
निष्पाप झाडांच्या कत्तली
आसपासही उभी होती
चारदोन गावातली माणसं
सरेआम सुरू होता खून
विज्ञानयुगात माणसाने तयार केलेल्या
धारदार कातील शस्त्राने
आता कैफियत द्यावी कुणाकडे
प्रश्नच पडलायं कधीचा
रस्त्याच्या दुतर्फा उभी असायची
माणसाच्या स्वागतास झाडे
फुलांचा वर्षाव, फळे, सावली
सारंकाही अर्पण करायची झाडे
आता इथे माणसांनी
झाडांचे स्वागताचे हात कापले
उपकारांची जाण सोडून
स्वार्थ पाहिले आपआपले
सूर्य जळून राहिला इथे
आधीच करपलेल्या भुईवर
रोजच जाळते जगण्याची चिंता
अन तो ही आग ओकतो देहावर
मुक्या जनावरांची अन् पाखरांची
जरा करशील माणसा कदर
आता शोधावी कुठे सावली
झाडांचेही कापलेत माणसांनी पदर
शहरीकरणाच्या नादात उध्वस्त केलीत
माणसांनी बिचारी झाडं
अजूनही वेळ आहे माणसा
चला आता झाडांना तारूया
काळ्या भूईत इथल्या
एक नवा श्वास पेरूया
