एक नोकर जोकर...
एक नोकर जोकर...


मित्र म्हणून भेटला परिवाराला एक नोकर
काय सांगावं निघाला भलताच हो जोकर
कामचोर तो शहाणा हस हस हसवायचा
त्याची नौटंकी बघून पोटात गोळा यायचा
कामाच्या बढाई मारत सदा लाडात यायचा
येणाऱ्या-जाणाऱ्यास सर्रास दामटून लावायचा
मस्तीत विचित्र हातवारे करत हसून रडवायचा
नको म्हटलं ना तरी सर्वांना गुदगुल्या करायचा
घरातल्या मांजरीशी खेळायचा भातुकल्या
चिमुकल्यांना खिदळत दाखवायचा वाकुल्या
पाहुण्यांचे स्वागत हसमुख विनोदाने करायचा
जाताना मात्र वाटाण्याच्या अक्षदा दयायचा
एक दिवस आम्हालाच कामाला लावायचा
गंमतीशीरपणे अधिकारी टिंगल उडवायचा
कधी मीही करायचे हं, मुद्दाम त्याची गंमत
पिटाळता त्याला बाहेर, घालायचा हुज्जत
वैतागून कधी केले जरी उभे त्याला दाराबाहेर
सदा वात्रटपणाचा मिळे घरचाच हो आहेर
प्रत्येकाची नक्कल करत कायम वावरायचा
कुणाचा प्रतिसाद नसता खो-खो हसायचा
नकळत सगळ्यांच्या आनंदाचा तो हिस्सेदार
जणू कुटुंबीयांचा आवडीचा विनोदी भांडार
हशा पिट म्हटलं तर लगेच भरायचा होकार
मैत्रीखातरचा साथी, आमचा एक जोकर