दुसरी बाजू
दुसरी बाजू
मला कळतंय
तू मांडतोस तुझ्या शब्दांतून
माझ्या मूक वेदनेची सल
मला दिसतेय
त्यामागची तुझी कणव...
अन् भिडतेय ती तुझ्या शब्दांतून
लोकांच्या हृदयापर्यंत
मीही करतेय रे
तुझं भरभरून कौतुक
पण सांगावंसं वाटतंय तुला
त्यामध्येही आहे अजूनही
बरीचशी उणीव..!!
तू दाखवतोस ती
निर्विवाद आहे
नाण्याची एक बाजू
परखड आणि सत्य...
पण पाहिलीस का कधी
त्याच नाण्याची दुसरी बाजू?
पाहशील तर कळेल तुलाही
त्याविना आहे रे सारेच मिथ्या..!!
तू वाईट वाटून घेऊ नको
सत्य जरा कडवट आहे
पुरुषांच्या अधिसत्तेत
स्त्रीची नित्याची परवड आहे...
मग वादळ प्रेमाचं असो,
वा असो सहानुभूतीचं
वाळूच्या आधारात
झाडाची निश्चित पडझड आहे..!!
आता हेच बघ ना,
माझ्याच वेदनेच्या भांडवलावर
तू तात्काळ प्रसिद्धीस येतो...
सर्वत्र तुझा उदो उदो होतो
स्त्री उदार मतवादी म्हणून
जो तो तुलाच नावाजतो..!!
फायदा तुझा होतो पण माझं काय..?
मी मात्र अजूनही
त्याच निराशेच्या खोल गर्तेत
वेदनेशी झगडतेय
आपल्या अस्तित्वाशी लढतेय
सल मिटता मिटत नाही
खंत अजून तशीच आहे
चारचौघात मिरवणारा
माझा सखा, मित्र, हितचिंतक
अंधारात तसाच वर्चस्वास हपापलेला
केवळ एक पुरुष असतो..!!
