दिवाळी-एक संस्कृती
दिवाळी-एक संस्कृती
दिवाळी नाव उरलंय फक्त सणांच्या आघाडीपूरता
दिवाळी राहून गेली फक्त सुरसुरीच्या काडीपूरता ।।धृ।।
आधी ऑफिसमधल्या कामांमधली रजाच काहीशी वेगळी होती
मामा मावश्यांकडे जाण्याची मजाच काहीशी वेगळी होती
आता ती मजा उरली आहे स्वतःच्याच घरच्या माडीपूरता
दिवाळी राहून गेली फक्त सुरसुरीच्या काडीपूरता ।।१।।
फटाक्यांच्या जल्लोषासाठी उत्सुक गगन किती असायचं
कपड्यांची खरेदी करण्यासाठी मन उत्सुक किती राहायचं
ती उत्सुकता भरून राहिली आहे फक्त स्वतःच्याच घरच्या माडीपूरता
दिवाळी राहून गेली फक्त सुरसुरीच्या काडीपूरता ।।२।।
आनंद साजरा करता करता जणू पुनवच व्हायची आवसाची
पूजाविधी करता करता पार सायंकाळ व्हायची दिवसाची
औक्षण फक्त होतं आता तेही करतात आवडीपूरता
दिवाळी राहून गेली फक्त सुरसुरीच्या काडीपूरता ।।४।।
त्या लख्ख लख्ख पणत्यांच्या प्रकाशात अंगण चमकत किती असायचं
फुलांच्या माळांनी सजवलेलं घर प्रसन्न किती असायचं
त्या फुलांच्या माळा राहून गेल्या आहेत आता अंगणामधल्या गाडीपूरता
दिवाळी राहून गेली फक्त सुरसुरीच्या काडीपूरता ।।४।।
पूर्वी लोक आनंदाने एके ठिकाणी एकत्र यायचे
दुःख,त्रास सगळं विसरुन आनंदाच्या भेटीत लीन व्हायचे
आता फक्त एक कॉलच करतात तोही त्यांच्या सवडीपूरता
दिवाळी राहून गेली फक्त सुरसुरीच्या काडीपूरता ।।५।।
चला तर मग आता धावत्या जगाचा वेग सोडून पुन्हा एकत्र येऊया
नात्यांच्या विझलेल्या दिव्यात पुन्हा तेल टाकून दिवाळीचा दिवा लावूया
यापुढे दिवाळी राहायला नकोय सुरसुरीच्या काडीपूरता
चला सारे दिवाळी साजरा करूया प्रसन्नतेचा वाढीकरता ।।६।।
