डोह स्मृतींचा
डोह स्मृतींचा
अगदी खोल खोल मनाच्या तळकोटात,
जाणीवांच्या चांदणडोहात....
गवसलेले मोती आठवांचे....
बसले वेचत मनसोक्त..
भावविभोर होऊन, बसले गुंतून त्यांच्यातच,
बघत रूपडे एकेकाचे....
काळाच्या धुक्याने धूसर झालेल्या स्मृतींना,
आठवाच्या प्रकाशाने उजळीत.
दिपून गेले अगदी ...
काही स्मृतींच्या तेजोमय प्रकाशाने.....
त्या प्रकाशाचं हसरं चांदणं
डोळ्यात अन् मनात साठवत.
हृदयामृताचा पेला काठोकाठ भरलेला...
अरे....!
त्या तळकोटातच हसरं प्रवळाचं बेट..!
दिपले त्याच्या सौंदर्याने
,
नकळतच ओढली गेले...
दुरून भुलवणारं त्याचं रूपडं पण
अंतरंग खोल जखमांनी ..
विदीर्ण झालेलं...
सुखाच्या वरवरच्या विणीतून,उसवल्या टाक्यागत...
त्या अमृताच्या पेल्याच्या चहूबाजूला
पसरलेल्या त्या हलाहलाच्या स्मृतींनी
भोवळायला झालेलं....
तोल जाणारच ,
तोच सावरले...
पाचू, माणकादी सुंदर रत्नांच्या दर्शनाने
जणू खोल जखमांवरची नक्षीदार मलमपट्टीच!
काळाच्या ओघात..
त्या जखमांवर धरलेली खपली तशीच ठेऊन
अलगद आले वर...
स्मृतीच्या चांदणडोहाला तिथेच ठेऊन....!