चंद्रकोर
चंद्रकोर


राया मला आण ना रे
भरजरी लाल पैठणी नवी
त्यावर ब्राॅकेडची चोळी
मँचिंग पण मला हवी....
लाल पैठणीवर लाल झुमके
हातातले कंगन हवे लाल सोनेरी
मेंदी लालचुटूक रंगेन छान
नव्या नव्या लाजर्या वधूपरी....
कंबरेसाठी नवा कंबरपट्टा हवा
छानसा झुपकेदार गोंडेदार नवा
दंडावर वाकी हवी मला मोत्यांची
त्यावर मोरही छान मला हवा.....
गळा शोभेल माझ्या मोतीहार
पैठणीवर असेल वेलबुट्टी छानदार
मंगळसूत्र मिरवेन मी झोकात
ललना तुझी रे मी लय घाटदार.....
चंद्रकोर सजवेन उंच भाळी
शोभेन हं ती चंद्रमा परी
तू पाहतच राहशील मजला
नयनी साठवून घेशील मला कितीतरी....