चलना सखाया
चलना सखाया
श्वासाची ही मैफल आपुल्या,
रंग त्यामधे सख्या भरू .
निजल्या वेली निजले पक्षी ,
सोनेरी क्षण पुन्हा स्मरू .
आसमंती या दरवळ दाटे ,
रातराणी ही फुलली रे .
अनुरागी या मनात माझ्या ,
भास मिठीचे स्मरले रे .
लुकलुक करती किती तारका ,
चंद्र रोहिणी सवे फिरे .
चुंबननक्षी देहावरती ,
आजही त्याची स्मृती उरे .
मंद मोगरा धुंद गंध हा ,
निसर्ग फुलूनी कसा हसे .
मधुचंद्राच्या त्या रातीचे ,
जणु अंगावर मोरपिसे .
समुद्र लाटा उधान वारा,
मन भिरभिरते तुझ्या सवे .
कटिभवती कर असा असु दे ,
स्वर्ग सुख हे मला हवे .
चल ना सखया पुन्हा एकदा ,
परतून त्या गावी जावू .
मैफिल भरवू श्वासाची पण ,
कधीच भैरवी ना गाऊ
